कन्हान शहरात असामाजिक तत्वांचा वाढतोय वावर; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!


कन्हान शहरात असामाजिक तत्वांचा वाढतोय वावर; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!

टुव्हीलर गाडीची बॅटरी चार्ज करण्यासाठी गेलेल्या तरुणांवर लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा आरोप; एकाच्या पायाला गंभीर दुखापत

घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या; आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी

कन्हान : - कन्हान शहरातील मातोश्री सर्व्हिस सेंटरजवळ किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळून मारहाण, लोखंडी कोयत्याने हल्ला तसेच शिवीगाळ व धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, कन्हान शहरात असामाजिक तत्वांचा वावर वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.


मंगळवार (दि.६) ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता लक्की ठाकूर पात्रे (वय २५) रा.सत्रापुर यांनी कन्हान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो सत्रापूर येथील रहिवासी असून खाजगी काम करतो. ते आपला चुलत भाऊ निखिल निंमचद पात्रे व लक्ष्मण ऊर्फ ओम लोंडे यांच्यासोबत टुव्हीलर गाडीची बॅटरी चार्ज करण्यासाठी कन्हान येथील मातोश्री सर्व्हिस सेंटरजवळ गेले होते. तक्रारीनुसार, त्याठिकाणी फोरव्हिलर एम एच ४९ बी डब्लू ८२६२ या वाहनातून आलेल्या व्यक्तींनी रस्त्यावर वाहन थांबवून वाद घातला. यावेळी निखिल पात्रे याला हाताने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर वाहनातील अन्य व्यक्तींनी खाली उतरून लखी ठाकूर पात्रे व निखिल पात्रे यांच्याशीही हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने वीट फेकून मारल्याने ती लक्की ठाकूर पात्रे यांच्यासोबत असलेल्या लक्ष्मण ऊर्फ ओम लोंडे यांच्या डाव्या पायाला घोट्याजवळ लागून दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, खैलेश सलामे यांनी वाहनातून लोखंडी कोयता काढून फिर्यादीवर फिरवला तसेच “देख लुंगा तुम्हारे गारुडी को” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच निखिल पात्रे यांच्या खिशातील ५०० रुपये काढून घेतल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी लक्की ठाकूर पात्रे यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


घटनेनंतर पोलीस ठाण्यात नागरिकांची गर्दी; काही काळ तणावाचे वातावरण


घटनेची माहिती परिसरात पसरताच सत्रापूर आणि एमजी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कन्हान पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक गौडा यांनी नगरसेवक समशेर पुरवले यांच्यासोबत अशब्द वापरल्याचा आरोप काही नागरिकांनी केले. या आरोपामुळे उपस्थित नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर नागरिक शांत झाले असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.


“कन्हानमध्ये गुन्हेगारांचा धाक की पोलिसांचा?”; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी


दरम्यान, स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेतील काही आरोपींकडून मागील काही दिवसांपासून परिसरात हातात शस्त्र घेऊन फिरणे, नागरिकांना शिवीगाळ करणे, धमकावणे आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अशा प्रकारच्या तक्रारी आणि घटना सातत्याने समोर येत असतील तर कन्हान शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे, अशी भावना ज्येष्ठ नागरिक व जागरूक नागरिक व्यक्ति करीत आहेत. काही नागरिकांकडून तर “गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. काहींच्या मते, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळेत कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विशेष लक्ष घालावे


कन्हान शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. कन्हान शहरासाठी विशेष पथक तयार करून दहशत निर्माण करणाऱ्या, शस्त्रांचा वापर करणाऱ्या तसेच वारंवार कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर कठोर आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कायदा सर्वांसाठी समान असून, नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये. कन्हान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा जागरूक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या