रामटेक रेल्वे क्रॉसिंगजवळ गहुहिवरा रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांची खासदार श्यामकुमार बर्वे यांनी घेतली दखल

रामटेक रेल्वे क्रॉसिंगजवळ गहुहिवरा रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांची खासदार श्यामकुमार बर्वे यांनी घेतली दखल


घटनास्थळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश ; निमखेडा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामालाही गती देण्याचे आदेश


कन्हान : - कन्हान - रामटेक मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळील गहुहिवरा रोडची अत्यंत दयनीय अवस्था, राधाकृष्ण नगर परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे आणि निमखेडा येथील प्रलंबित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा प्रश्न लक्षात घेऊन रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.


कन्हानहून रामटेककडे जाणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगजवळील गहुहिवरा रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून लहान-मोठ्या अपघातांच्या घटनाही घडत आहेत. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारींची दखल घेत खासदार बर्वे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून परिस्थितीची पाहणी केली.


पाहणीदरम्यान गहुहिवरा रोडवरील सर्व खड्डे तातडीने बुजविणे, राधाकृष्ण नगर परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे तसेच निमखेडा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.


यावेळी कन्हान - पिपरी नगर परिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, मुख्याधिकारी दीपक घोडके, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे (एमआरआयडीसी समन्वयक) अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यानंतर निमखेडा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्यात येणार असून ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान हा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच गहुहिवरा रोडवरील खड्डे आणि राधाकृष्ण नगरातील पाणी साचण्याच्या समस्येवरही तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.


यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या