कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार डॉ. राजीव पोतदार यांची भेट ; आरोग्य सेवांचा घेतला आढावा
नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा देण्याच्या सूचना ; वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा
कन्हान : - नागपूर विधान परिषद सदस्य आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी बुधवार (दि. १५ जुलै) रोजी कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत आरोग्य सेवेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून उपलब्ध वैद्यकीय सुविधा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच आरोग्य केंद्रातील व्यवस्थेची माहिती घेतली.
भेटीदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीर्वाद नागपुरकर व कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. एकांक्षा कानफाडे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्रातील मनुष्यबळ, औषधांचा पुरवठा, स्वच्छता, रुग्णसेवा तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक रुग्णाला वेळेत, दर्जेदार व संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा तसेच आरोग्य केंद्रात स्वच्छता, शिस्त आणि सेवा गुणवत्तेमध्ये सातत्य राखण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच रुग्णांशी आपुलकीने वागणे, आवश्यक औषधे उपलब्ध ठेवणे, गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळतील यासाठी प्रभावी नियोजन करणे आणि आरोग्य केंद्रातील सर्व सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण कर्मचाऱ्यांनी आमदार डॉ. राजीव पोतदार यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीमुळे आरोग्य केंद्रातील सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ आयुषी डंभारे , आरोग्य सहायक हंसराज ढोके , सुनील गायकवाड , आरोग्य सेवक श्रावण इंगळे , प्रनील सोनेने , तिरुपती येतम , सुधाकर पवार , महेंद्र सांगोडे प्रामुख्याने उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time