कन्हानमध्ये दुकानदारांना फसविण्याचा संशय



कन्हानमध्ये दुकानदारांना फसविण्याचा संशय

बोलण्यात गुंतवून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न ; नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

अफवांवर विश्वास न ठेवता संशयितांची माहिती तात्काळ पोलिसांना द्या – पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचे आवाहन

कन्हान : - कन्हान परिसरात काही संशयित व्यक्ती दुकानदारांना बोलण्यात गुंतवून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन कन्हान पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन पुरुष व एक महिला अशा तिघांचा गट दुकानात येऊन किरकोळ वस्तू खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराला बोलण्यात गुंतवतो. मोठ्या नोटेचे सुट्टे करून घेतल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या वस्तू मागणे, पैसे परत मागणे किंवा गोंधळ निर्माण करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारच्या व्यवहारादरम्यान दुकानदारांनी घाईगडबड न करता प्रत्येक व्यवहाराची खात्री करूनच पैसे परत द्यावेत, असेही पोलिसांनी सुचविले आहे.

पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी सांगितले की, नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा फसवणुकीचा प्रयत्न आढळल्यास त्वरित आपत्कालीन सेवा क्रमांक 112 वर किंवा कन्हान पोलीस ठाणे तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल.

कन्हान पोलिसांनी व्यापारी, व्यावसायिक व सर्व नागरिकांना व्यवहार करताना विशेष दक्षता घेण्याचे, अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी बाळगण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद बाब त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे.

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या