किशोर ज्वेलर्समध्ये चोरी ; ७० हजारांचे चांदीचे दागिने लंपास


किशोर ज्वेलर्समध्ये चोरी ; ७० हजारांचे चांदीचे दागिने लंपास


न्यू गोंडेगाव येथील घटना ; कन्हान पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा,


 सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू


कन्हान : - कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू गोंडेगाव येथे असलेल्या किशोर ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून सुमारे ७० हजार रुपये किमतीचे २५० ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.


पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, टेकाडी येथील रहिवासी किशोर सुरेश गुरव (वय ४२) यांचे न्यू गोंडेगाव येथे किशोर ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. शनिवारी (दि. ११ जुलै) दिवसभर व्यवसाय करून त्यांनी सायंकाळी सुमारे ७ वाजता दुकान बंद करून घरी गेले .


रविवारी (दि. १२ जुलै) पहाटे सुमारे ५.५० वाजता दुकाना शेजारी राहणारे अक्षय आगरे यांनी किशोर यांना दूरध्वनीवरून दुकानाचे शटर फोडून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर किशोर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुकानाचे लोखंडी शटर खालच्या बाजूने वाकवलेले दिसताच त्यांनी कन्हान पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीससांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून पाहणी केली असता, दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले चांदीचे कानातले, अंगठ्या, तार, पायल तसेच इतर दागिने असा सुमारे २५० ग्रॅम वजन किंमत अंदाजे ७० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, दुकानातील सोन्याचे दागिने सुरक्षित असून चोरट्यांनी त्यांना हात लावला नसल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासानुसार, अज्ञात चोरट्यांनी शनिवारी सायंकाळी ७ ते रविवारी पहाटे ५.४५ वाजता च्या दरम्यान दुकानाचे शटर वाकवून ही चोरी केली आणि घटनास्थळावरून पसार झाले.


या प्रकरणी कन्हान पोलीसांनी किशोर गुरव यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या