कन्हानमध्ये १ किलो २० ग्रॅम गांजासह तिघांना अटक
मारुती कार, तीन मोबाईलसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त ; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
कन्हान : कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा कांद्री शिवारातील नागपूर–जबलपूर महामार्गावरून गजानन नगरकडे जाणाऱ्या मार्गावर कन्हान पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत १ किलो २० ग्रॅम गांजासह तिघा आरोपींना अटक केली. या कारवाईत गांजा, मारुती ८०० कार आणि तीन मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. ११ जुलै) रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रिना मिसाळ, पोलीस हवालदार हरीश सोनभद्रे, अमित यादव, पोलीस शिपाई जीवन विघे, दीपक कुंभलकर व इतर कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत गांजा तस्करीबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार मौजा कांद्री शिवारातील नागपूर–जबलपूर महामार्गावरून गजानन नगरकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली.
नाकाबंदीदरम्यान एमएच-३०-एफ-०५७५ क्रमांकाची संशयित मारुती कार येतांना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता कारच्या डॅशबोर्डमध्ये खाकी टेपने पॅक केलेल्या पॅकेटमध्ये १ किलो २० ग्रॅम गांजा आढळून आला.
याप्रकरणी पोलिसांनी समीर शिवप्रकाश कश्यप (२२), हर्ष उमाशंकर निशाद (१९) आणि हर्ष ओमप्रकाश कश्यप (२३), तिन्ही रा. खदान क्र. ३, कन्हान यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून ६० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, ७० हजार रुपये किमतीची मारुती ८०० कार आणि २० हजार रुपये किमतीचा गांजा असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रिना मिसाळ यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रिना मिसाळ, पोलीस हवालदार हरीश सोनभद्रे, अमित यादव, पोलीस शिपाई जीवन विघे, दीपक कुंभलकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
सह संपादक - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time