रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली


रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली


कन्हान (प्रतिनिधी) : कन्हान परिसरातील बोरडा - कांद्री मार्गावर २० वर्षांपूर्वी झालेल्या हृदयद्रावक रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ५७ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .


३ फेब्रुवारी २००५ हा दिवस कन्हान परिसरासाठी काळा दिवस ठरला. बोरडा - कांद्री रोडवर रामटेक - नागपूर पॅसेंजर ट्रेन आणि काचुरवाही येथे लग्नाची वरात परत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या संख्येने वरातीतील लोक होते.

ट्रॅक्टर रेल्वे फाटक ओलांडत असताना अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनची धडक बसली. या जोरदार टक्कर मध्ये ट्रॅक्टर मधील अनेक प्रवासी जागीच ठार झाले, तर काहींनी उपचारादरम्यान प्राण गमावले.


या भीषण दुर्घटनेत एकूण ५७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश होता, त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. या घटनेमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. काहींनी आपल्या कुटुंबातील कर्त्याला गमावले, तर काहींवर अपंगत्वाची नामुष्की आली.


अपघाताच्या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते—चिंध्या उडालेला ट्रॅक्टर, जखमींच्या आक्रोशाने भरलेला परिसर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली निष्पाप नागरिकांची प्रेते... हे सगळं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं.


या घटनेनंतर प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. सुरक्षा यंत्रणांचा हलगर्जीपणा, रेल्वे आणि स्थानिक प्रशासनातील समन्वयाचा अभाव यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी या दुर्घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आज २० वर्षे उलटून गेली तरीही या दुर्घटनेच्या वेदना जिवंत आहेत.


सोमवार, ३ फेब्रुवारी २०२५ रोजी या दुर्घटनेला २० वर्षे पूर्ण झाल्याने संजय सत्येकार आणि दयाराम भोयर यांच्या पुढाकाराने अपघातस्थळी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर संजय सत्येकार, किशोर बेलसरे, जितेंद्र चव्हाण यांसह मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी या दुर्घटनेचे दु:ख व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.


यानंतर सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.


या कार्यक्रमाला संजय सत्येकार, किशोर बेलसरे, रिंकेश चवरे, शंकर इनवते, श्रीराम नांदूरकर, भगवानदास यादव, जितेंद्र चौहान, सुभाष तडस, संदीप नेहूल, राजू गुडधे, नरेश पोटभरे, नरहरी पोटभरे, कैलास काकडे, ऋषभ बावनकर, जितेंद्र सोरते, हरिदास तिरोडे, गजानन आकरे, नामदेव कामडे, ईशा कामडे, मोहन सावरकर, नरेंद्र ठाकरे, दिनेश बंड, रवींद्र दुपारे, बादल विश्वकर्मा, प्रमोद हुमणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


ही घटना संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दु:खदायक होती. मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांचे स्मरण चिरंतन राहावे, यासाठी अशा श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या