कन्हान - पिपरी नगर परिषद सभागृहात नवीन कायद्यांची जनजागृती कार्यशाळा


कन्हान - पिपरी नगर परिषद सभागृहात नवीन कायद्यांची जनजागृती कार्यशाळा

पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल


कन्हान : - नागरिकांमध्ये कायदेशीर जागृती निर्माण करून त्यांना नव्या कायद्यांची संपूर्ण माहिती मिळावी , तसेच कायद्यांचे महत्त्व समजावे , यासाठी कन्हान पोलीस विभागाच्या वतीने दोन दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . ही कार्यशाळा बुधवार (दि.५) आणि गुरुवार (दि.६) फेब्रुवारी रोजी कन्हान - पिपरी नगर परिषद सभागृहात पार पडली .


या कार्यक्रमात कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना कायद्यांचे नागरिकांच्या जीवनातील महत्त्व विषद केले . नवीन कायदे का आणि कसे लागू करण्यात आले , याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .


सरकारी सहायक अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय , कामठी येथील सौ.अॅड.अंजना भिवगडे यांनी भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) , भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 (BNSS) आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 (BEB) या तीन नव्या कायद्यांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर सखोल मार्गदर्शन केले .


कार्यशाळे दरम्यान , नागरिकांनी कायद्यांची माहिती घेतली पाहिजे , कायदे समजून घेतल्यास स्वतःचे व समाजाचे संरक्षण शक्य आहे , असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला . नव्या कायद्यांमध्ये गुन्हेगारांवरील कठोर कारवाईचा तरतूद असून , दैनंदिन जीवनातील सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत .

कायद्यांचे योग्य आकलन झाल्यास नागरिक फसवणूक , गुन्हेगारी कृत्ये आणि इतर कायदेशीर अडचणींपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात . या कायद्यांमुळे महिलांचे संरक्षण , गुन्हेगारी प्रवृत्ती रोखणे , सायबर क्राईमवर कठोर कारवाई आणि न्यायप्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवणे शक्य होणार आहे .


कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाने नागरिकांना सुरक्षेचे महत्त्व पटवून देताना , गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घ्यावे , असे आवाहन केले .


सदर कार्यशाळेत गावातील प्रतिष्ठित नागरिक , पोलीस पाटील , आंगणवाडी सेविका आणि मदतनीस , महिला दक्षता समितीतील सदस्य तसेच पत्रकार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते . पोलीस कर्मचारी आतिश मानवटकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले .


कन्हान पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये कायदेविषयी जागरूकता वाढली असून , कायद्यांचे पालन हाच स्वतःच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेचा मार्ग आहे , हे अधोरेखित झाले . पोलिसांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले .

Public awareness workshop on new laws at Kanhan - Pipri Municipal Council Hall

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या