कन्हान परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच ! दोन ठिकाणी चोरी, तब्बल १.६७ लाखांचा ऐवज लंपास


कन्हान परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच ! दोन ठिकाणी चोरी, तब्बल १.६७ लाखांचा ऐवज लंपास


कन्हान: कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून , या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण १,६७,२५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे . कन्हान पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे .


रविवार ,२ फेब्रुवारी , सकाळी ११ वाजता , सतीश ओंकारेश्वर येरपुडे (४०, रा. नरहरी नगर, कांद्री) हे आपल्या कुटुंबासह मामाच्या गावी (पांजरा, ता. मोहाडी, जि. भंडारा) मंडईच्या कार्यक्रमासाठी गेले होते . मात्र , ४ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता त्यांचा स्कुल व्हॅन चालक अखिलेश गेडाम (रा. खेडी-खोपडी) याने फोन करून घराच्या मुख्य दरवाजाची स्थिती संशयास्पद असल्याचे सांगितले .


सतीश घरी पोहोचल्यावर त्यांना गेटला कुलूप , मात्र मुख्य दरवाजा अर्धवट उघडा आढळला . घरात प्रवेश करताच त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले . चोरट्यांनी दोन कपाटे आणि दोन दिवाण फोडून रोख १०,००० रुपए आणि सोन्या-चांदीचे दागिने अंदाजे किंमत ३८,२५० रुपए असा एकूण ४८,२५० रुपयांचा चा मुद्देमाल लंपास केला .

दुसऱ्या एका घटनेत विशाल संतापे (रा. खदान) यांचे घर फोडून चोरट्यांनी ₹१ ,१९ ,००० रुपयांचा ऐवज लंपास केला . विशाल आपल्या कुटुंबासह २ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता उत्तर प्रदेशात लग्न समारंभाला गेले होते . घर रिकामे असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडले आणि घरातील मौल्यवान वस्तू लुटल्या .


५ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता , विशाल यांच्या घराशेजारी राहणाऱ्या जया पराणी यांनी विशाल यांच्या बहिणीला माधुरी धनराज संतापे (३४, रा. खदान) यांना फोन करून घर उघडे असल्याची माहिती दिली . माधुरी घटनास्थळी पोहोचली असता दोन्ही दरवाज्यांची कुलपे तोडलेली आणि बेडरूममधील आलमारी उघड्या अवस्थेत असल्याचे दिसले . सोन्याचे मंगळसूत्र , दोन टॉप्स , चांदीच्या पायपट्ट्या आणि इतर दागिने असा एकूण १ ,१९ ,००० किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला .


या दोन मोठ्या घरफोड्यांमुळे कन्हान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत .घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस करीत असून , लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा पोलीसांनी केला आहे .


कन्हान मध्ये चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून , नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . आता कन्हान पोलीस किती दिवसांत गुन्हे उघडकीस आणतात , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Burglary season continues in Kanhan area! Burglary at two places, property worth Rs 1.67 lakhs looted

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या