कन्हान - पिपरी नगर परिषद निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्याची मागणी
वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाला निवेदन
कन्हान : - देशात ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) संदर्भात सतत वादंग सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने कन्हान नगर परिषद निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या महासचिव आणि कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामन मेश्राम यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष मॅडम यांना लेखी निवेदन सादर करून EVM विरोधात निवडणुक बहिष्कार जन आंदोलनाचा इशारा दिला आहे .
2014 पासून देशभरात ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आल्यापासून निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केला आहे.
EVM हॅकिंग, बटन कोणत्याही पक्षाला दाबले तरी भाजपलाच मत जाणे, काही ठिकाणी मशीन गायब होणे अशा घटनांमुळे जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान अशा अनेक राज्यांत निवडणुकीनंतर EVM मशीनबाबत गोंधळ आणि संशयास्पद प्रकार समोर आले आहेत.
पक्षपाती निवडणूक आयोग, भाजपला अनुकूल निकाल आणि पारदर्शकतेचा अभाव हे मुद्दे विरोधकांनी सातत्याने उपस्थित केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, EVM वर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, आणि त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे.
"भारतात निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली पाहिजे. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजप सरकारच्या धोरणांमुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे. निवडणुकीत सातत्याने घडणाऱ्या गडबडींमुळे जनतेचा विश्वास उडाला आहे," असे वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनात म्हटले आहे.
येत्या नगर परिषद निवडणुकीत पारदर्शकता आणि लोकशाही प्रक्रिया अबाधित ठेवण्यासाठी EVM ऐवजी बॅलेट पेपर पद्धतीने निवडणूक घेण्याचा ठराव मंजूर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
"जर प्रशासनाने EVM मशीन हटवण्याचा निर्णय घेतला नाही, तर आम्ही निवडणुक बहिष्कार जनआंदोलन उभारू आणि त्यासाठी होणाऱ्या गोंधळाची पूर्ण जबाबदारी शासन-प्रशासनावर असेल," असा थेट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने ही मागणी केवळ नगरपरिषदपर्यंत मर्यादित ठेवली नाही, तर देशभरात याबाबत आवाज उठवण्यासाठी विविध शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयांना देखील निवेदनाची प्रत पाठवली आहे.
कन्हान शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. बऱ्याच लोकांचे मत आहे की, EVM द्वारे मतदान करताना गोंधळ निर्माण होतो, त्यामुळे पारंपरिक बॅलेट पेपर प्रणाली हाच उत्तम पर्याय आहे.
या मागणीवर कन्हान नगर परिषद आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. EVM ऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारला जाणार का? याबाबत लवकरच स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, जर प्रशासन आणि निवडणूक आयोगाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर मोठे आंदोलन छेडले जाईल.
"लोकशाही टिकवायची असेल, तर बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल. नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल!" असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
Demand to hold Kanhan-Pipri Municipal Council elections on ballot paper
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time