वाडी उड्डाणपुलाला ‘श्री संत जगनाडे महाराज’ यांचे नाव देण्याची मागणी
ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी आमदार समीर मेघे यांचे वेधले लक्ष
श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे निवेदन
वाडी : - नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडी येथील उड्डाणपुलाला ‘श्री संत जगनाडे महाराज उड्डाणपूल’ असे अधिकृत नाव देण्यात यावे, तसेच भारताच्या २०२६ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र गणना करून जनगणना पत्रिकेत ‘OBC’ साठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटना, हिंगणा-वाडी, नागपूर ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरजी मेघे यांना निवेदन देऊन ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती याबाबत अचूक आकडेवारी उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र ओबीसी जनगणना आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले.
ओबीसी समाज हा देशातील मोठा सामाजिक घटक असूनही त्यांची स्वतंत्र व अधिकृत सर्वंकष जनगणना झालेली नाही. त्यामुळे ओबीसींची वास्तविक लोकसंख्या तसेच सामाजिक-आर्थिक परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होत नाही. परिणामी शिक्षण, रोजगार, आरक्षण, आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांचे प्रभावी नियोजन करण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे २०२६ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्रपणे गणना करण्यात यावी आणि जनगणना पत्रिकेत ‘OBC’ साठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मांडावी, अशी विनंती आमदार समीर मेघे यांच्याकडे करण्यात आली.
दरम्यान, नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडी येथील उड्डाणपुलाला ‘श्री संत जगनाडे महाराज’ यांचे नाव अधिकृतपणे देण्यात यावे, अशीही मागणी संघटनेने केली. संत जगनाडे महाराज यांच्या कार्याला आणि सामाजिक योगदानाला सन्मान मिळावा, या भावनेतून ही मागणी करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वाडी उड्डाणपुलाला संत जगनाडे महाराजांचे नाव देण्याच्या मागणीबाबत शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा करून ती सकारात्मकपणे मार्गी लावावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.
यावेळी पुरुषोत्तम लिचडे, कमलाकर पाटील, संजय जीवनकर, दीपक अवचट, अनिल बजाईत, ज्ञानेश्वर विठ्ठल वंजारी, कान्होपात्रा रोडे (महिला तालुकाध्यक्ष), प्रकाश बिडवाईक, साधना घोडरे, संजय लांबट, अमोल कोहळे, अरुण कैकाडी (तालुकाध्यक्ष हिंगणा), वसंता राडे, मोतीराम शहारे, वासुदेव लिचडे, अर्जुन जांभुळकर, चेतन वरटकर, रौशन वैद्य, प्रशांत बुटले, जयंवंती कैकाडी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
“वाडी उड्डाणपुलाला संत जगनाडे महाराजांचे नाव आणि जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम—या दोन्ही मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन न्याय द्यावा,” अशी अपेक्षा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सह संपादक - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time