शाळेकडे जाणारा कच्चा रस्ता बनला विद्यार्थ्यांसाठी धोकादायक!


शाळेकडे जाणारा कच्चा रस्ता बनला विद्यार्थ्यांसाठी धोकादायक!


पाटील नगरमागील प्रभाग क्र. १७ मधील रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करण्याची मागणी


कन्हान : - कांद्री नगरपंचायत अंतर्गत पाटील नगरमागील प्रभाग क्र. १७ येथे वच्छलागोपी पब्लिक स्कूल असून या शाळेत दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेकडे जाणारा रस्ता अद्याप कच्चा असून तो कालव्याच्या (कॅनल) बाजूने असल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


पावसाळ्यात या कच्च्या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असून चिखल, पाणी आणि घसरड्या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरून घसरून अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


शाळेकडे जाणारा हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी ही महत्त्वाचा असून त्याची दुरवस्था गेल्या काही काळापासून कायम आहे. शाळेत दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असल्याने रस्त्याची तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.


विद्यार्थी, पालक व नागरिकांची गैरसोय दूर करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करून पक्का रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


याबाबत वच्छलागोपी पब्लिक स्कूलच्या समन्वयक बीना राजपाल सिंग यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने कांद्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मा. सचिन गाढवे यांना निवेदन देऊन रस्त्याचे तातडीने डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करण्याची मागणी केली आहे.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करून कांद्री नगरपंचायतीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या