दीपक पॉलिश सेंटर ज्वेलर्स फोडले; चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास


दीपक पॉलिश सेंटर ज्वेलर्स फोडले; चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास


तीन दिवसांत दोन ज्वेलर्सची दुकाने फोडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


कन्हान : - कन्हान शहरातील गणेशनगर परिसरात असलेल्या दीपक पॉलिश सेंटर ज्वेलर्स या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांचा चांदीचा ऐवज, सोन्याचे मणी व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १४ जुलै) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे कन्हान शहरातील व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अवघ्या तीन दिवसांत दोन ज्वेलर्सच्या दुकानांवर चोरी झाल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शामलाल मनिराम रोकडे (वय ६०, रा. रायनगर, वार्ड क्र. ३, कन्हान) हे गेल्या २६ वर्षांपासून ज्वेलर्सचा व्यवसाय करीत आहेत. सोमवार (दि. १३ जुलै) रोजी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. मंगळवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तातडीने नातेवाईकांना व कन्हान पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांच्या उपस्थितीत दुकान उघडून पाहिले असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तपासणीदरम्यान चांदीच्या १५ अंगठ्या, १२ हातकडे, १० जोड बिचवे, ३ जोड तोरड्या, १० चांदीचे सिक्के, गणेश-लक्ष्मीची चांदीची मूर्ती, सुमारे २ ग्रॅम सोन्याचे बारीक मणी तसेच ३ हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.


फिर्यादी शामलाल रोकडे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.


दरम्यान, याच आठवड्यात न्यू गोंडेगाव येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातही चोरीची घटना घडल्याने अवघ्या तीन दिवसांत दोन ज्वेलर्सची दुकाने फोडली गेली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या