शबरी घरकुल योजनेअंतर्गत कन्हानला ५० घरकुलांची मंजुरी
नगरसेविका योगिता भालवी यांच्या पाठपुराव्याला यश ; पालकमंत्री बावनकुळे यांचे सहकार्य
कन्हान : - अनुसूचित जमाती (एस.टी.) घटकांच्या गृहनिर्माणासाठी राबविण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी कन्हान नगरपरिषद क्षेत्राला तब्बल ५० घरकुलांची मंजुरी मिळाली आहे. या यशामागे नगरपरिषद कन्हानच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका योगिता भालवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
यापूर्वी या योजनेअंतर्गत केवळ २२ घरकुलांना मंजुरी मिळत होती. मात्र योगिता भालवी यांनी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून अतिरिक्त २८ घरकुलांची मंजुरी मिळवून दिली, त्यामुळे एकूण मंजूर घरकुलांची संख्या ५० वर पोहोचली आहे.
या प्रस्तावाला मंजुरी मिळवून देण्यासाठी राज्याचे पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विशेष सहकार्य केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कन्हान परिसरातील अनुसूचित जमातीतील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, ५० घरकुल मंजुरीचे पत्र मुख्याधिकारी दीपक घोडके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी घोडके यांनी योगिता भालवी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत, या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार असल्याचे मत व्यक्त केले.
या मंजुरीमुळे कन्हान परिसरातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time